हिरा......
माझ्या गांवातील लोकांना हे नांव नवीन नाही. मी पाहिलेल्या अनेक व्यक्तींपैकी हा एक...जगावेगळा. हिरा ...सध्या काय करतो माहित नाही. त्यावेळी म्हणजे दहा वर्षांपूर्वी तो जेमतेम चाळीशीचा असावा पण सारं गांव त्याला एकेरी नावानं हाक मारायचं कारण तो कुणालाच कधी परका वाटला नाही. हिरा आठवला कि गावातील प्रत्येकाला स्वत:चं बालपण आठवतं. सातारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असणारं माझं गांव. गावातल्या गल्ली बोळातून नगरपालिकेचा गाडा ओढत, कचरा गोळा करत गावाची स्वच्छता करणारा एक सफाई कामगार...एक अवलिया...हिरा. "हिरा आठवतोय का?" म्हणताक्षणी माझ्यासारख्या बय्राच जणांना त्याचं मूर्त स्वरूप नजरेसमोर येतं. उंचीने बुटकासा,काळा-सावळा वर्ण,जाड मिशांचे आकडे वळवलेले,डोक्यावर कसातरी बांधलेला फेटा. कायम एकच पोशाख.अंगात बंडी, बंडीवर घातलेले काळ्या रंगाचे हाफ जॅकेट. खाली कळकटलेले धोतर ज्याला पांढरा रंग होता असे सांगावे लागेल. असलीच तर पायात चप्पल. कचय्रात सापडलेले वेगवेगळे मणी एकत्र ओवून त्यांची गळ्यात घातलेली माळ. त्या माळेच्या मध्यभागी ओवलेला एक दात. पाचही बोटात वेगवेगळ