हिरा......




माझ्या गांवातील लोकांना हे नांव नवीन नाही. मी पाहिलेल्या अनेक व्यक्तींपैकी हा एक...जगावेगळा.

हिरा...सध्या काय करतो माहित नाही. त्यावेळी म्हणजे दहा वर्षांपूर्वी तो जेमतेम चाळीशीचा असावा पण सारं गांव त्याला एकेरी नावानं हाक मारायचं कारण तो कुणालाच कधी परका वाटला नाही. हिरा आठवला कि गावातील प्रत्येकाला स्वत:चं बालपण आठवतं. सातारा जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असणारं माझं गांव. गावातल्या गल्ली बोळातून नगरपालिकेचा गाडा ओढत, कचरा गोळा करत गावाची स्वच्छता करणारा एक सफाई कामगार...एक अवलिया...हिरा.

"हिरा आठवतोय का?" म्हणताक्षणी माझ्यासारख्या बय्राच जणांना त्याचं मूर्त स्वरूप नजरेसमोर येतं. उंचीने बुटकासा,काळा-सावळा वर्ण,जाड मिशांचे आकडे वळवलेले,डोक्यावर कसातरी बांधलेला फेटा. कायम एकच पोशाख.अंगात बंडी, बंडीवर घातलेले काळ्या रंगाचे हाफ जॅकेट. खाली कळकटलेले धोतर ज्याला पांढरा रंग होता असे सांगावे लागेल. असलीच तर पायात चप्पल. कचय्रात सापडलेले वेगवेगळे मणी एकत्र ओवून त्यांची गळ्यात घातलेली माळ. त्या माळेच्या मध्यभागी ओवलेला एक दात. पाचही बोटात वेगवेगळ्या अंगठया अर्थात सर्व नकली असलेल्या. असा हिराचा एकंदर पेहराव असायचा. त्याला महिन्यातून कधीतरी धुलाईसुद्धा असायची. गावातल्या आया-बायांना त्यांची चिल्ली-पिल्ली दमवायला लागली कि त्यांना नेहमी हिराची आठवण व्हायची. एखादी माऊली पोटच्या पोराच्या पाठीत धपाटा घालून म्हणायची,"थांब! हिरा आला कि तुला त्यालाच देऊन टाकते." असं म्हणताक्षणी पोरगं सुतासारखं सरळ व्हायचं. रस्त्यानं हिरा जाऊ लागला म्हणजे रस्त्यावरची शेंबडी पोरं एका ढेंगत आपलं घर गाठायची. कदाचित एखादं त्याच्या हातात सापडायचं आणि हिरा त्याला हाSSS करून डोळे मोठे करायचा आणि त्या पोराच्या रडण्यानं साय्रा आळीला कळायचं हिरा आलाय...

पहिल्या-पहिल्यांदा मी ही त्याला घाबरायचो नंतर सराव झाला. थोडं मोठं झाल्यावर लहान वात्रट पोरांच्य हाताला धरून त्याच्यासमोर उभं करायला लागलो. पण मला राहून-राहून एका गोष्टीचं कायम आश्चर्य वाटत रहायचं कि लहान मुलांना रोज-रोज घाबरवण्याच्या खेळाचा हिराला कंटाळा येत नसेल का? एक मात्र जाणवायचं,हिरानं डोळे कितीही मोठे केले तरी त्यात रागापेक्षा कारूण्यच जास्त ठासून भरलेलं असायचं. जे मोठयांना दिसायचं पण लहानांना ओळखता येत नव्हतं.

रोज तिन्हीकाळ हिरा कायम तरर्र् असायचा त्यमुळे मुळात लाल असलेले त्याचे डोळे तांबरलेले दिसायचे. कधी चुकून त्याच्याशी संवाद साधला तर त्याचे कोल्हाटी हेल कानाला वेगळेच वाटायचे. कधी हिरा गावातील तुंबलेल्या गटारातील घाण हाताने काढताना दिसायचा आणि कधी 'जास्त झाली' तर त्याच गटाराशी एकरूप झालेला दिसायचा. गावाची घाण काढताना हिराला दारूरूपी औषधाची गरज भासत असावी असे वाटते. 

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक मुलं हिराच्या घरी जायची कारण हिरा मस्तपैकी भोवरे बनवून देत असे. बैलांच्या शिंगापासून केलेले वेगवेगळ्या प्रकारचे भोवरे कित्येक वर्ष टिकत असत.


हिराला कुणाशीही काहीही देणंघेणं नव्हतं. हिरा आपल्याच मस्तीत जगत असायचा.

जमाना बदललाय. सर्वकाही इन्स्टंट झालयं. आजकाल लहान मुलं स्वत:च्या आई-बापालाच काय डायनोसॉरला सुद्धा घाबरत नाहीत.

आत्ता हिरा कुठं हरवलाय. त्याचा मुलांना घाबरवण्याचा धंदा अजून तेजीत आहे का? कुणास ठाऊक......

Comments

Rahimapur said…
I dont belive are related to rahimatpur.Nice man keep it up .

Regards,
atulmane10@gmail.com
Unknown said…
Very Very Very....
Nice....
Ekdam Zakkas !!!
Sabkuch Chandi hai...
Unknown said…
ek dam zakkas
cant imagine

Popular posts from this blog

रहिमतपूर...म्हणजे काय?

पाऊस काय म्हणतोय्...